(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा)
नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकदिवसाचा कोकण दौरा पार पडला असून तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची त्यांनी पाहणी केली. मात्र उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर मनसेचे सरचिटणीस आणि नेते संदीप देशपांडे यांनी उपरोधिक टोला लगावला असून ‘चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात’ असे संदीप देशपांडेंनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
कालच कोकण सिंधुदुर्ग दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी “विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी कोकणवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही. पंचनाम्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नुकसान भरपाईवर दोन दिवसात निर्णय घेऊ” असे स्पष्ट सांगितले होते. सोबतच पंचनामे पूर्ण होताच मदती संदर्भात निर्णय घेणार असे आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात दिले.
“मी वैफल्यग्रस्त नाही, मी येथे दुःख जाणून घ्यायला आलो आहे. दिलासा देण्यासाठी आलो आहे. फोटोसेशनसाठी नाही” असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री येत्या दोन दिवसात यावर काय निर्णय घेणार यावर सर्वांचे लक्ष लागले असून विरोधकांकडून अद्यापही टिकांचा वर्षाव सुरूच असल्याचे दिसून येत आहे.