नंदुरबार राजमुद्रा दर्पण । शहादा– दोंडाईचा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीची वारंवार मागणी करून देखील दुरूस्ती होत नसल्याने आज शेतकरी संघर्ष समितीचा रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० एच यावरील शहादा– दोंडाईचा दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सदर रस्त्याची दुरुस्ती व्हावी. यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने वारंवार बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन देण्यात आली.
सदर रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास शेतकऱ्यांना रास्ता रोको आंदोलनाशिवाय पर्याय नाही; असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून ऊस, कापूस, पपई या पिकांची काढणी सुरू आहे. मात्र रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे ऊस वाहतूक होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी सदर विभागाने त्वरित रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी आक्रमक दिसून आले.
पोलिस प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे करत आंदोलन न करता अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढावा अशी विनंती केल्यानंतर शहादा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, बांधकाम विभाग अधिकारी यांच्याबरोबर शेतकरी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यात आली. यावेळी रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांच्यावतीने लेखी आश्वासन देऊन सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम ३० नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करणार असल्याची माहिती उपअभियंत्यांनी दिली.