मुंबई राजमुद्रा दर्पण । एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. हा संप चिघळत चालला आहे. सरकारही या संपाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या संपात हस्तक्षेप करून मार्ग काढा, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली.
या संपावर मार्ग काढण्याऐवजी सरकार संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. कामगारांना निलंबनाच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहे. सेवा समाप्तीच्या धमक्या दिल्या जात आहेत. भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. त्यामुळे कामगार भयभीत झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही राज्यपालांची भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत परिवहन मंत्री आणि परिवहन सचिवांकडून माहिती घ्या. काय पद्धतीने काम चालू आहे याची सरकारकडे विचारणा करा. तसेच इतके दिवस संप सुरू असताना सरकार काय करत आहे याची माहिती घ्या, अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली आहे. त्यावर राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं पडळकर म्हणाले.