(राजमुद्रा वृत्तसेवा)
योग गुरु बाबा रामदेव यांनी नुकतीच अॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. या टीकेच्या अनुषंगाने इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्रमक पवित्रा घेतला असून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील सफदरजंग येथील रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत त्यांच्यावर महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सोशल मीडियामध्ये बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये ते अॅलोपॅथी उपाचर पद्धतीविरोधात बोलताना दिसत आहेत. याची गंभीर देखल IMA नं घेतली असून याबाबत एक प्रेसनोट प्रसिद्ध केली आहे. यामध्ये बाबा रामदेव यांनी आपल्या व्हिडिओत अॅलोपॅथीवर केलेल्या आरोपांचा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी स्विकार करावा आणि देशातील ही आधुनिक चिकित्सापद्धती बंद करावी अथवा बाबा रामदेव यांच्यावर महामारी रोग अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
“भारत सध्या कोविड-१९ महामारीचा सामना करत आहे. या बिकट काळात अॅलोपॅथी ही आधुनिक चिकित्सा पद्धती आणि भारत सरकार मिळून लोकांची जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. या संर्घषात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या १२०० अॅलोपॅथी डॉक्टरांनी आपलं बलिदान दिलं आहे.” असे या प्रेसनोट मध्ये नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, प्रेसनोटमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना उद्देशून IMA नं म्हटलं की, व्हिडिओत बाबा रामदेव म्हणतात “अॅलोपॅथी एक मूर्ख आणि दिवाळ काढणारं विज्ञान आहे.” पण जेव्हा बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण हे आजारी पडतात तेव्हा ते देखील या अॅलोपॅथीच औषधं घेतात. त्यामुळे बाबा रामदेव अॅलोपॅथीवर बिनबुडाचे आरोप करत आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. कारण रामदेव बाबांना बेकायदा आणि मंजुरी नसलेली औषध विकायची आहेत”
व्हायरल व्हिडिओमध्ये बाब रामदेव म्हणतात, “कोविड-१९ महामारीमुळे होत असलेल्या मृत्यूंमागे अॅलोपॅथीचं कारण सांगण्यात आलं आहे. अॅलोपॅथीची औषधं खाऊनच लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये न गेल्यानं आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झालेल्या मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू अॅलोपॅथीची औषधं खाऊन झाले आहेत”.
बाबा रामदेव यांच्या अॅलोपॅथीविरोधातील या विधानामुळं सध्या कोविड संकटात रुग्णालयांमध्ये आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणारे डॉक्टर्स आणि हेल्थवर्कर्समध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.