(पुणे राजमुद्रा वृत्तसेवा)
येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटरमध्ये करोनाचा संसर्ग झालेल्या बालकांसाठी विशेष बालकक्ष आहे. यामध्ये ४० खाटा बालक आणि त्यांच्या पालकांसाठी असलेल्या सेंटरचे उद्घाटन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज ऑनलाईनच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर निशाणा साधत विरोधकांना चक्क ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिसची उपमा दिली.
“कोरोना महामारीच्या काळात मुंबईतील चांगल्या कामाची जागतिक आरोग्य संघटना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकजणांनी दखल घेतली. या कामाचे विशेष कौतुक केले आहे, मात्र एवढं चांगलं काम केलं तरी विरोधक टीका करतात. त्याकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष द्यावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) आहेत,” अशा शब्दात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधला. सकारात्मक राहून काम करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, शिवसेनचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक ॲड. अविनाश साळवे उपस्थित होते.