जळगाव राजमुद्रा दर्पण । कौन बनेगा करोडपतीची २५ लाखांची लॉटरी लागली आहे; अस सांगत रक्कम मिळवण्यासाठी रांजनगाव येथील महिलेकडून २ लाख ९२ हजार ७०९ रुपये उकळण्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शबानाबानो शेख सादीक (वय ४०) यांना ८ नोव्हेंबरला अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. फोनवर बोलणार्या संबंधितांने शबानोबानो यांना तुम्हाला २५ लाख रुपयांची कौन बनेगा करोडपतीची लॉटरी लागल्याचे सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या नंबरवरुन वेगवेगळ्या नावांनी संबंधितांनी फोन करुन शबानोबानो यांचा विश्वास संपादन केला. लॉटरी लागलेले २५ लाख रुपये मिळविण्यासाठी इन्कम टॅक्स व इतर चार्जेसच्या नावाखाली शबानोबानो यांना ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार शबानोबानो यांनी संबंधितांना दहा दिवसात २ लाख ९२ हजार ७०९ रुपये ऑनलाईन पाठविले. पैसे स्विकारल्यानंतर शबानोबानो यांना कुठल्याही प्रकारचे लॉटरी लागल्याचे पैसे मिळाले नाही. आपल्याला कुठलीही रक्कम मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यावर शबानोबानो यांनी बुधवारी (१७ नोव्हेंबर) जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या क्रमाकांवरुन फोन करणार्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.