(पुणे राजमुद्रा वृत्तसेवा)
गेल्या दोन महिन्यापासून शासनाच्या कडक निर्बंधांमुळे पुण्यामधील व्यापारी हतबल झाले असून 31 मे नंतर दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी या संदर्भातील पत्र पुणे व्यापारी महासंघाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज देण्यात आले.
गेल्या दोन महिन्यांमध्ये 75000 कोटी रुपयांचे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून 31 मे नंतर दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी त्याच प्रमाणे आर्थिक पॅकेजही जाहीर करण्यात यावे सोबतच वीज बिल आणि बँकांवरील कर्जाच्या व्याजावर माफी देण्यात यावी अशा मागण्या या पत्रात करण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना हे पत्र देण्यात आले असून यावर विचार करून लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांपासून कोणतेही व्यापारी दुकाने उघडी नसल्यामुळे सबंध महाराष्ट्रातील व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर संकटात अडकला आहे. व्यापारासाठी काढलेले कर्ज तसेच इतर देणी यांच्यावर कोणतेही बंधन नसून ती द्यावी लागणार असल्याने व्यापारी वर्ग आर्थिकतेच्या बोजा खाली दाबला जात आहे. कालच मुंबईतील व्यापारी वर्गाने याबाबत विनंती अर्ज दाखल केला होता. महाराष्ट्रभरातून सबंध व्यापारी वर्गाकडून 31 मे नंतर दुकाने उघडण्याची मागणी करण्यात येत आहे.