अमळनेर राजमुद्रा दर्पण । मेहेरगाव (ता.अमळनेर) येथील एका शेतकरी महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्यामुळे महिलेने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (२१ नोव्हेंबर) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
मेहेरगाव येथील कोकीळाबाई संजय पाटील (वय ४७) या महिलेने पिळोदा येथील सुधाकर दत्तात्रय साळुंखे यांच्या मेहेरगाव शिवरातील शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. कोकिळाबाई यांच्याकडे सात एकर शेती होती. त्यांच्यावर सोसायटीचे दोन लाख पीक कर्ज तर खाजगी सावकाराचे चार ते पाच लाख रुपये कर्ज होते. कर्जापोटी कोकीळाबाईने आत्महत्या केल्याचे सरपंच राकेश ठाकरे यांनी सांगितले. गेल्या वर्षी कर्जापोटी शेती विकली गेली होती. कोकीळाबाई यांच्या पश्चात पती व दोन अविवाहित मुले असा परिवार आहे. सदर महिलेचे दिर सुरेश देविदास पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.