(राजमुद्रा वृत्तसेवा)
भारतात निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सरकारवर याबाबत टीका होत आहे. जगभरात पसरलेल्या करोना महामारीचा कोणत्या नेतृत्वाने नीट मुकाबला केला. यासंदर्भात ‘द कॉन्व्हर्सेशन’ या वेबसाईटने एक जनमत चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत निघालेल्या निष्कर्षावरून राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटर वरून चांगलाच टोला लगावला आहे.
“अमेरिकेतील ‘द कॉन्व्हर्सेशन’ वेबसाइटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली. कोरोना काळात सर्वांत सुमार कामगिरी करणारे नेते कोण, यावर चाचणी झाली. या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं. सर्वांत वाईट कामगिरीसाठी त्यांना एकूण (७५,४५०) ९० टक्के मतं मिळाली.” असं ट्विट करता राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींवर टोला लगावला आहे.
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांबद्दल अमेरिकेमधील ‘द कॉनव्हर्सेशन’ या वेबसाईटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली होती. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. या ऑनलाइन जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ७५ हजार ४५० जणांनी आपली मतं नोंदवली. त्यापैकी सर्वाधिक मतं म्हणजेच ९० टक्के मतं ही मोदींना मिळाली. म्हणजेच ७५ हजार ४५० जणांपैकी ६७ हजार ९०५ जणांनी मोदी हे जगामध्ये करोना परिस्थिती हाताळण्यात सर्वात वाईट कामगिरी करणारे नेते असल्याचं मतं मांडलं आहे. त्यापाठोपाठ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ५ टक्के तर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना ३.७ टक्के मतं मिळाली आहेत. मॅक्सिकोच्या अॅमलो यांना या पोलमध्ये १.३ टक्के मतं मिळाली आहेत.