मुंबई राजमुद्रा दर्पण । केंद्र सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कृषी कायदे मागे घेण्यासोबत खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी यासह 26 विधेयके मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापैकी एक नार्कोटिक्स ड्रग्ज बिल, 2021 या विधेयकाचाही समावेश असणार आहे. त्याअंतर्गत गांजा, भांग यासह अंमली पदार्थ अल्प प्रमाणात बाळगणे हा गुन्हा मानला जाणार नाही अशी तरतूद करण्यात येणार आहे. या कायद्यामुळे अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या लोकांना सुधारण्याची संधी मिळेल, असे मत सरकारने व्यक्त केले आहे.
दरम्यान, बुधवारी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ज्यामध्ये कृषीविषयक कायदे मागे घेण्यासह एकूण 26 विधेयके संसदेत मांडण्यास मान्यता दिली जाऊ शकते. गेल्या आठवड्यात जनतेला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यासाठी आता संसदेत विधेयक मांडले जाणार आहे. तब्बल एक वर्षापासून शेतकरी आंदोलन कृषी कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी सुरु होते. त्यामुळे हे आंदोलन संपवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, आताही एमएसपी हमी कायद्यासह सहा मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या नेते राकेश टिकैत यांनी केली होती.