मुंबई राजमुद्रा दर्पण । गेल्या आठ दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ते उपचार घेत आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही त्यांना काही दिवस आराम करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार की नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे दिला जाणार याबाबतची जोरदार चर्चा सुरु आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, त्यांना डिस्चार्ज कधी मिळेल त्याबाबतची नेमकी माहिती देण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज दिल्यानंतरही त्यांना किमान दोन महिने आराम करावा लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा भार कुणाकडे जाणार याबाबतची सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा भार दिला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. सोशल मीडियातही तसे मेसेज व्हायरल होत आहेत. मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्यात आल्याचे मेसेज व्हायर होत होते. त्यावेळी स्वत: शिंदे यांनी आपल्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्यात आलेली नाहीत. मुख्यमंत्री एकदोन दिवसातच रुग्णालयातून घरी येतील असं म्हटलं होतं.