भुसावळ राजमुद्रा दर्पण । साकेगाव परिसरातील महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेल्या दोन मुली गावातच खोली घेऊन राहतात. या तरुणींना गावातील युवकाने अश्लील भाषेत धमकी देऊन छेड काढली. यानंतर त्याच्या कुटुंबाने या तरुणींना ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोलावून बेदम मारहाण केली. याबाबत पीडित तरुणींनी विनयभंगासह जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.
साकेगाव परिसरातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दोन मैत्रिणी साकेगाव येथे रूम करून राहतात. त्यांनी गावातील त्यांच्या ओळखीच्या भरत चंद्रकांत मराठे या तरूणाला एटीएममध्ये घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, त्याने मदत तर केली नाहीच, पण दिवसभर फोन करून अश्लील भाषेत धमकावल्याचा आरोप तरुणींनी केला आहे. सोमवारी रात्री साडेनऊला भरत याच्यासह त्याचे वडील चंद्रकांत मराठे, आई छायाबाई मराठे, यशवंत मिस्त्री आणि शुभम यांनी या दोन्ही तरुणींना ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोलावले. तेथे त्यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. रात्रीच्या वेळेस गावात झालेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.
या संदर्भात संबंधित तरुणीने भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर भरत मराठे, छायाबाई मराठे, चंद्रकांत मराठे, यशवंत मिस्त्री, शुभम (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मंगळवारी (ता. २३) अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी गावात भेट देत घटनेची माहिती जाणून घेतली. गावातील वातावरण चिघळू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.