(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा)
देशातील काही राज्यांत करोनाच्या दुसऱ्या संसर्गाची लाट कमी होताना दिसत असली, धोका कायम आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीतील नवीन करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. मात्र, मृत्यूंची संख्या चिंताजनक आहे. त्यातच करोनाचं नवीन म्युटेंट लहान मुलांसाठी घातक असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या आरोग्यबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात लहान मुलं आणि बालकांमधील कोविड संसर्ग रोखण्यासाठी बाल रोग विभाग निर्माण करण्यात आला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्स बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससह राज्यातील बालरोग तज्ञांना मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री म्हणाले,”“पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग झाला. सध्या दुसरी लाट आहे. ज्यात आपण अनुभवतोय की युवा आणि मध्यमवयीन नागरिकांना संसर्ग होत आहे. आता मुलांचा वर्ग राहिलेला आहे आणि त्याच्यात ही लाट येण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवल्यानंतर आपण शांत बसणं हे काही शक्य नाही. करोनाविरोधातील लढण्यासाठी सर्वाधिक तयारी महाराष्ट्राने केली आहे,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,”राज्यात करोनाचा कहर उच्चांक गाठत असल्यानं देशभरात भीतीचं वातावरण होतं. पण मी राज्याच्या हितासाठी लॉकडाउनचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की, कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून सहकार्य केलं. त्यामुळे हे जे काही नियंत्रण आलेलं आहे, मात्र अजुन यश मिळालेलं नाही,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे १ जूननंतरच्या निर्बंधाबद्दल सूचक विधान केलं आहे.
“करोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, पण नागरिकांनी घाबरू नये. घाबरण्याचं कारण नाही. मात्र दक्षता नक्की घ्यायला हवी. तिसरी लाट येऊ नये हा आपला प्रयत्न आहे. सध्याच्या लाटेत आपल्याला ऑक्सिजनसह अन्य बाबींचा तुटवडा जाणवला. भविष्यात आणखी तुटवडा जाणवू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांत मला महाराष्ट्र ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण करायचा आहे.” असेही मुख्यमंत्री म्हणाले.