जळगाव राजमृद्रा दर्पण । जळगाव – भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर तरसोद फाट्याजवळ भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली.
जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळु आणि गौणखनिजाचा उपसा आणि वाहतुक सुरु असून हे डंपर आणि ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने धावत असल्याने असे अनेक अपघात या महामार्गावर होत आहेत. असाच एक अपघात तरसोद फाट्याजवद झाला आहे. वाळू डंपर क्रमांक एमएच.१९.वाय.७७७३ ने दुचाकीस्वार महिलेला जोरदार धडक दिली. यात एक महिला जागीच ठार झाली असून एक जण जखमी झालेला आहे.
दरम्यान, मृत महिला प्रेरणा देविदास तायडे वय-३२ रा.कंडारी, ता.भुसावळ येथील असल्याची माहिती समोर आली आहे. प्रेरणा तायडे या जिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिका असून कामावरून सुट्टी झाल्याने त्या घरी जात होत्या. तर, या अपघातामुळे अवैध वाळू वाहतुकीवर निर्बंध कधी येणार हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. नशिराबाद पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला.