मुंबई राजमुद्रा दर्पण। झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटाची मोठी उत्सुकता चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांना होती. आज 361 वर्षांचा काळ उलटला असला तरी हा अतुलनीय लढा आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे.
प्रेक्षकांची ही आतुरता आता संपणार आहे, येत्या 31 डिसेंबरला स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची ही विजयगाथा ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे. ए.ए.फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे.