नाशिक राजमुद्रा दर्पण । ऊसाला 3700 रुपये भाव देण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. सांगली, कोल्हापूर, सातारा यापेक्षा नगरची स्थिती वेगळी नाही. मात्र, टनामागे पंधराशे रुपयांचा फरक पडतो, असं शेट्टी म्हणाले. तसंच भ्रष्टाचाराचा आरोप झालेले कारखाने चौकशी करुन सुरु करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
साखरेचा क्विंटलमागे 400 ते 500 रुपये भाव वाढला आहे. इथेनॉलचे भाव वाढले आहेत. साखरेला चांगले दिवस आले, मात्र नाशिकच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा घेता येत नाही. द्राक्ष पिकांचंही अवकाळीनं नुकसान झालं. आता छाटणी कधी करायची असा प्रश्न बागायतदारांसमोर आहे. छाटणी केली तरी पाऊस पडतो, नाही केली तरी पडतो. बाहेरचे व्यापारी गायब होण्याच्या घटनाही घडतात. अशा व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी काही तरतूद नाही. त्यामुळे परवानाधारक व्यापाऱ्यांनाच खरेदी करायला परवानगी देण्याची मागणीही शेट्टी यांनी केलीय. तसंच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष परिषद घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय. द्राक्ष उत्पादकांची चिंता मिटवू. सरकारनं कारवाई केली नाही तर कायदा हातात घेऊ. शेतकरी आंदोलनाची आम्ही प्रेरणा घेतली. त्यांना आधार देण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ताकद नाशिकच्या शेतकऱ्यांच्या मागे लावू, असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिलाय.