नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असून मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार असल्याची भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली आहे. कधी दिवाळीनंतर सरकार कोसळेल, तर कधी नव्या वर्षात सरकार कोसळेल असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र, राणेंनी दिलेल्या डेडलाईनमध्ये सरकार काही कोसळलेलं नाही. त्यामुळे राणेंनी आता केलेली भविष्यवाणीही केवळ हुलबाजी असल्याचं समजलं जात आहे.
दरम्यान, भाजपने कितीही दावे केले तरी अंकांचं जे गणित आहे ते जुळवणं भाजपला शक्य झालं नाही. आणि ते कधीही शक्य होणार नाही. पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश सदस्य एका पक्षातून बाहेर पडतात तेव्हाच त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. तेव्हाच तो संपूर्ण गट एखाद्या पक्षाला पाठिंबा देतो आणि सरकार बनू शकते, असं राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी सांगितलं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सदस्य फोडायचे म्हटलं तर 34 किंवा 38 सदस्य फोडावे लागतील. एकाचवेळी कोणत्याही पक्षातून एवढे सदस्य फोडणं भाजपला शक्य नाहीये. कमीत कमी आमदार फुटले तर राजीनामा देऊन त्यांना बाहेर पडावे लागेल. भाजपही या आमदारांना निवडून आणण्याची गॅरंटी घेऊ शकत नाही, असंही भावसार यांनी सांगितलं.