(पुणे राजमुद्रा वृत्तसेवा)
पुणे जिल्ह्यातील तळेगावमध्ये मोबाईल फुटण्याच्या किरकोळ वादातून सुनेने सासूचा ब्लाउजने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांकडून आरोपी महिला व तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार ‘अडीच वर्षीय नातवाने आजीचा मोबाईल खेळण्यासाठी घेतला होता. तो, खेळत असताना फुटला यावरून आजीने नातवाला रागवत “मोबाईल कोण भरून देणार?” असा सवाल केला. या कारणावरून सुन आणि सासुमध्ये वाद निर्माण झाले. यातूनच घरातील ब्लाउज घेऊन अडीच वर्षीय मुलासमोरच सुनेने सासूचा गळा आवळून खून केला. पूजा शिंदे आणि तिचा पती तथा मृत महिलेचा मुलगा मिलिंद शिंदे या दोघांना पोलिसांनी या ५० वर्षीय बेबी शिंदे यांची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
दिनांक २१ मे रोजी ही घटना घडली तेव्हा, घरात अडीच वर्षीय मुलाव्यतिरिक्त कोणीही नव्हते. मृतदेह राहत्या घराच्या टेरिसवर पोत्यात घालून लपवून ठेवला. मात्र, काही तासांनी टेरिसवर दुर्गंधी येत असल्याने इतरांना संशय आला. हे लक्षात घेऊन पूजाने पोत्यात टाकलेला मृतदेह ओढत ओढत शेजारील झाडीत लपवला. मात्र, इथंच सर्व बिंग फुटलं आणि घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्याचा छडा लावला. यात, गुन्ह्यात मदत केल्या प्रकरणी पती मिलिंदला देखील अटक करण्यात आली आहे.
आरोपी पूजा आणि मिलिंद या दोघांचं २०१७ साली लग्न झालं. शिंदे कुटुंबात सासू बेबी शिंदे, दिर असा चार जणांचं एकत्रित कुटुंब होतं. दरम्यान, काही महिन्यातच सून पूजा आणि सासू बेबी यांच्यात खटके उडण्यास सुरवात झाली. दोघींचं अजिबात पटत नव्हतं, अनेकदा किरकोळ करणावरुन या दोघींमध्ये अगदी टोकाचे वाद व्हायचे. नातू झाल्यानंतर तरी सासू सुनांचा वाद मिटेल असं घरातील व्यक्तींना वाटत होते मात्र वादातून सासूचा सुनेने खून केल्याने नातेवाईक हादरले.