(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा)
कल्याणमध्ये काही अज्ञानी चोरट्यांनी कोरोना प्रतिबंधक लस समजून चक्क पोलिओच्या लसींवर डल्ला मारल्याने हसावं की रडावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना काळात चोरट्यांची लसी चोरण्यापर्यंत मजल गेली असून रुग्णालयाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.
कल्याणच्या मलंगगड भागातील मांगरुळ आरोग्य केंद्रामध्ये लस चोरीचा हा प्रकार घडला असून चोरटे करोना प्रतिबंधक लसीचे डोस चोरण्यासाठी म्हणून आरोग्य केंद्रात घुसले होते. मात्र त्यांनी कोरोना लसी समजून पोलिओच्या लसींचे डोस चोरुन नेले. आरोपीने खिडकीचे गज वाकवून आरोग्य केंद्रात प्रवेश केला. तिथून निघताना चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि टीव्ही चोरुन नेला. या प्रकारामुळे रुग्णालयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.