जालना राजमुद्रा दर्पण । शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर सभापती असलेल्या जालना बाजार समितीत आज दुसऱ्या दिवशी देखील ईडीच्या पथकाने झाडाझडती घेणं सुरूच ठेवलं आहे. काल ईडीच्या पथकाने अर्जुन खोतकर यांच्या घरासह कार्यालय आणि बाजार समिती कार्यालयाची झाडाझडती घेतली होती. तर रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत अर्जुन खोतकर यांची ईडीच्या पथकाकडून तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली होती.
खोतकर यांच्यावर ईडीची कारवाई सुरूच असल्यानं खोतकर यांच्या घरी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात गोळा झाले आहेत. या शिवसैनिकांसोबत खोतकर यांनी बैठक घेतली असून शिवसैनिकांशी चर्चा केली आहे. या बैठकीला शिवसेनेचे जिल्ह्यातील प्रमुख नेते देखील उपस्थित आहेत.
काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या 12 तासांच्या चौकशीत, ED पथकाकडून अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांच्या कृषी उत्पन्न बाजर समितीच्या खोतकर बिजनेस सेंटर येथील कार्यालयाची झाडा झडती घेण्यात आली होती. यावेळी पथकाकडून काही कागदपत्रंही तपासण्यात आली, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजर समितीच्या कार्यालयातही ईडीच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली. यावेळी खोतकर बिजनेस सेंटर उभारण्यासाठी कृषी उत्पन्न बाजर समितीकडून देण्यात आलेला ठराव, बिजनेस सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या गाळ्याच्या लिलावाच्या व्यवहाराचे कागदपत्रंही तपासण्यात आली. दुपारी दोनच्या सुमारास ईडीचे पथक अर्जुन खोतकर यांचं निवास्थान असलेल्या दर्शना बंगल्यावर दाखल झालं. या ठिकाणी पथकाकडून अनेक कागदपत्रांची ही तपासणी केल्याची माहिती समोर आली होती.