मुंबई राजमुद्रा दर्पण । सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली आहे, तोच आफ्रिकेतून नव्या व्हेरीयंटची बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरीयंट आढळला असला तरी अद्याप भारतात या व्हेरीयंटचा अजून एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र व्हेरीयंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतून भारतात होणारी विमान वाहतूक रद्द करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेला नवा व्हेरिएंट अत्यंत घातक, जीवघेणा आणि वेगाने पसरणारा असल्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. देशातील सर्वच राज्यांना विशेष खबरदारी बाळगण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रही सतर्क झाला आहे. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जालना येथे पत्रकार परिषद घेऊन नव्या व्हेरिएंटबाबत राज्य सरकारने नेमकी कोणती प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत व उचलली जाणार आहेत, याची माहिती दिली.
राज्य सरकारने राज्यात सर्वत्र पहिलीपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच नवा व्हेरिएंट आला आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होईल. केंद्राच्या निर्णयाकडे सूचनेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. साडेसात कोटी जनतेने लसीचा पहिला डोस घेतला आहे. राज्यात 11 कोटी लसीकरणाचा टप्पा पार झाला आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं थांबवायला हवी. परिस्थितीबाबतची माहिती केंद्राला दिली आहे. देशात ह्या प्रकारचा व्हेरिएंट सापडलेला नाही. आफ्रिकेच्या भागातून येणाऱ्यांसाठी 72 तासांची आरटीपीआर टेस्ट अनिवार्य आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं पूर्णतः बंद करायला पाहिजेत. आफ्रिकेतून येणाऱ्यांसाठी निगेटिव्ह आरटीपीसीआर बंधनकारक असेल. नमुने तपासण्याचं काम सुरु आहे. आपल्याला सतर्क रहावं लागेल. विमान प्रवास करुन आलेल्यांची कोरोना तपासणी सुरु केली आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांचं स्क्रिनिंग सुरु आहे. ओमिक्रॉन विषाणूचं संसर्ग प्रमाण अधिक असेल तर त्या देशातील विमानं बंद केलेली बरी, अशी भूमिका राजेश टोपे यांनी मांडली.