नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनमुळे खळबळ उडाली आहे. दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिके वरून कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. आता त्या पाठोपाठ डोंबिवलीतही दक्षिण आफ्रिकेवरून आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. डोंबिवलीत केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्रीय आरोग्य विभागाकडून परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आज नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
नव्या नियमावलीनुसार परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांजवळ 72 तासांच्या आतील कोरोना निगेटीव्हचे प्रमाणपत्र आसणे आवश्यक आहे. ज्या देशात ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे, अशा देशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशांची विमानतळावर पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तर ज्या देशामध्ये कोरोनाचा धोका कमी आहे, अशा नागरिकांची रॅंडम पद्धतीने कोरोना चाचणी करण्यात येईल. कोरोना चाचणी झाल्यानंतर जर संबंधित व्यक्तीचा रिपोर्ट हा पॉझिटीव्ह आला तर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल. परदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सात दिवसांसाठी होम क्वॉरंटाईनची सक्ती करण्यात आली आहे. होम क्वॉरंटाईचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा आठव्या दिवशी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.