मुंबई राजमुद्रा दर्पण । प्रकाश जावडेकरांपासून अमृता फडणवीसांपर्यंत अनेकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. तर अजित पवार, संजय राऊत, नवाब मलिकांचा भाजपवर पलटवार केला. अशावेळी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सरकार पाडणार नाही, हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असा दावा केला आहे.
सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘भारताचा राजकीय इतिहास पाहिला तर अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ती अंतर्विरोधाने पडतात. जेव्हा सरकार अंतर्विरोधाने पडतात त्यावेळी आज पडेल की उद्या पडेल हे सांगता येत नाही. जेव्हा सरकार सर्वात मजबूत आहे असं वाटतं तेव्हाच ते पडतं. जेव्हा आता पडेल असं वाटतं तेव्हा ते टिकतं. त्यामुळे ही अशी सरकारे टिकत नाहीत. ते आपल्या अंतर्विरोधानेच पडेल. पहिल्या दिवशीपासून सांगतोय आम्ही सरकार पाडणार नाही. ज्या दिवशी सरकार पडेल. तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ’.