पुणे राजमुद्रा दर्पण । बालविवाह प्रतिबंधक कायदा असतानाही राज्यात बालविवाह होत आहेत. ते रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजे. मुलींच्या वयाची खोटी नोंद केली जाऊन बाळ विवाह करण्यात आले. परंतु आता ज्या ठिकाणी बालविवाह होतील, त्या गावच्या सरपंचाचे सरपंच पद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल. आणि वयाबाबत खोटी नोंद करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी इशारा दिला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची निवड झाली. त्याबद्दल खेड तालुक्यातील चाकण येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले. मी आंदोलन केले, संघर्ष केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे. राज्यातील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.पन्नास टक्के आरक्षण आमच्या हक्काचे आहे. वंशाला दिवा हवा म्हणून गर्भपात केला जातो. हुंडाबळींची समस्या राज्यात आहे. समाजात मुलींचे महिलांचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे. तसेच, पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीयासाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्याचा आमचा मानस आहे, असेही चाकणकर यांनी सांगितले.
या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी आमदार राम कांडगे यांंचीही भाषणे झाली. या वेळी खेड पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, सुरेखा मोहिते, सुरेखा टोपे, अरुण चांभारे, कैलास लिंभोरे, विलास कातोरे, चंद्रकांत इंगवले, किरण मांजरे, नितीन गोरे, शोभा शेवकरी, मंगल शेवकरी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.