जळगाव राजमुद्रा दर्पण । शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या रंगमंचाचे सुरु असलेले काम तांत्रिकदृष्ट्या चुकीचे व निरुपयोगी असून हे काम थांबविण्यात यावे, अशी मागणी जळगाव शहरातील नाट्य कलावंतांकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मंगळवार दि.३० रोजी मनपा आयुक्तांना देण्यात आले.
निवेदनात, कुठल्याही नाट्यगृहाचा रंगमंच हा लाकडी असतो आणि त्या खालील जागा ही मोकळी व पोकळ असते. कलावंतांना तासन तास उभे राहून तालीम, नाटक सादर करावे लागते. यामुळे पायांच्या स्नायूवर जोर येत असतो. लाकडी रंगमंच मुळे हा त्रास कमी होतो व हालचाली सुलभ होतात. रंगमंचच्या खालील पोकळ जागेमुळे रंगमंचावर उच्चारलेल्या शब्दाचा ध्वनीचा घुमार वाढवून त्याचे परावर्तन चांगल्यारीतीने होते. त्यामुळे स्टेज हा लाकडी असणे व त्याखाली मोकळी जागा असणे अत्यावश्यक आहे, तसेच रंगमंचाच्या दोन्ही बाजूला चार ते पाच विंगा व मागील पडदा व मुख्य पडदा जो खाली वर जाऊ शकेल याची देखील गरज असते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बालगंधर्व नाट्यगृहामध्ये मेकअप रुम, आरसे, खुर्च्या, लाइट, बाथरुम, दारे, खिडक्या अद्ययावत असल्या पाहीजेत. यासर्व गोष्टींची दुरुस्ती करण्यात यावी, बालगंधर्व नाट्यगृहात सुरु असलेले काम त्वरित थांबवून तांत्रिकदृष्ट्या अचूक काम सुरू करावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी, विशाल जाधव, दीपक पाटील, अरुण सानप, रमेश भोळे, गीतांजली ठाकरे, पवन खंबायत, गौरव लवंगे, विनोद ढगे, ॲड. कुणाल पवार, आरोही नेवे, प्रदीप भोई, विनय आहिरे, गौरव मोरे आदी नाट्यकलावंत उपस्थित होते.