जळगाव राजमुद्रा दर्पण । जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात पहिली ते चौथीच्या एकूण २ हजार ५६३ शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. यामुळे प्राथमिक शाळांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला मुलांचा किलबिलाट पुन्हा ऐकण्यास मिळत आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा सुरू केल्या. यानंतर आता ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीचे वर्ग बुधवारपासून सुरू होणार आहे़. या अनुषंगाने बहुतांश शाळांनी वर्ग खोल्यांचे सॅनिटायझेशन पूर्ण केले आहे. तर काही शाळांमध्ये साफसफाई, स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू होती. दोन वर्षानंतर प्राथमिकच्या शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. वर्गांमध्ये चिमुकल्यांचा उडणारा गोंधळदेखील आता सुरू होणार आहे. जळगाव जिल्ह्यात इयत्ता पहिली ते चौथीच्या २ हजार ५६३ शाळा असून यात ३ लाख १ हजार ६६५ विद्यार्थी प्रवेशीत आहेत. त्यामध्ये इयत्ता पहिलीचे ६८ हजार ९७१ तर दुसरीचे ७५ हजार ८६९ तसेच तिसरीचे ७९ हजार १३७ व चौथीच्या वर्गात ७७ हजार ६८८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.