जळगाव राजमुद्रा दर्पण । किन्ही येथील ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांनी चुंचाळे (ता. यावल) येथे बदली होऊनही त्यांच्या कार्यकाळातील ग्रामनिधी, पाणीपुरवठा, स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी, १४ वित्त आयोग, दलित वस्ती योजना याच्या कामाचे कोणतेही दप्तर दिले नाही. याबाबत जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी पाठपुरावा केला. यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी सुनावणी झाली. यात दहा दिवसांच्या आत दप्तर ताब्यात देण्याचा लेखी आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले. तरी देखील दप्तर न दिल्याने ग्रामसेवकांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन देखील दप्तर न दिल्याने प्रियंका अशोक बाविस्कर यांना एक महिना न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे आदेश दिले गेले आहे. जिल्हा परिषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांच्या तक्रारीवरून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. ग्रामसेविका बाविस्कर यांना वारंवार सुचना देऊनही दप्तर न दिल्याने दप्तर परत देईपर्यंत किमान ३० दिवस न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे निर्देश दिले आहे. याबाबतचे पत्र यावल पोलिस निरीक्षकासह जिल्हा तुरुंग अधीक्षकांना दिले आहे.