पुणे राजमुद्रा दर्पण । राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हा पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती झाली आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्याच्या अनेक भागांत जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ४८ तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड अशा विविध ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यात मंगळवारी दिवसभरात कमाल तापमानात घट झाल्याची नोंद करण्यात आली असून कोणत्याही भागात पाऊस झालेला नाही. विविध ठिकाणी ढगाळ हवामान होते. राज्यात सर्वाधिक ३४.५ अंश सेल्सिअस तापमान रत्नागिरीत, तर सर्वात कमी १०.९ अंश सेल्सिअस तापमान गोंदियात नोंदवण्यात आले.