धुळे राजमुद्रा दर्पण l तालुक्यातील न्याहळोद गावाच्या शिवारात पांझरा नदीकाठी बाभळाच्या आडोशाला सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी सोनगीर पोलिसांनी उध्वस्त केली. या कारवाईत 12 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्याहळोद येथील 28 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्याचे पोकॉ.विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.30 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास न्याहळोद गावाच्या शिवारातील कौठळ रोडच्या पुर्वेस असलेल्या विटाभट्टीसमोर पांझरा नदी किनारी बाभळाच्या काटेरी झुडपाच्या आडोशात रामकृष्ण प्रकाश सोनवणे (भील) याने बेकायदेशीररित्या गावठी दारूची हातभट्टी लावली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता या ठिकाणाहून पोलिसांनी तीन दगडाच्या चुली, 500 रूपये किंमतीचा पत्री ड्रम, त्यात 25 लिटर गुळ, नवसागर व पाणी मिश्रीत रसायन, मातीचे पडघे, 100 रूपये किंमतीचे अॅल्युमिनीयचे पातेले, प्लास्टीकची पोकळ नळी, दोन हजार रूपये किंमतीची 50 लिटर रसायन, दहा हजार रूपये किंमतीची गावठी दारू असा एकूण 12 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळूनआला. हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात रामकृष्ण सोनवणे विरूध्द मुंबई प्रोव्हीबिशन अॅक्ट कलम 65 (फ), (ब),(क),(इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ.व्ही.बी.पाटील करीत आहेत.