चाळीसगाव राजमुद्रा दर्पण । मजुरांना घेऊन येणारे भरधाव वाहन उलटल्याने तीन जण जागीच ठार झाले. तर सहा जण जखमी झाले. सदर अपघात नांदगाव रस्त्यावरील हिरापूर (ता. चाळीसगाव) गावाजवळ बुधवारी (ता.१) रात्री अकराच्या सुमारास घडला. या अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना प्राथमिक उपचारानंतर धुळे येथे रवाना करण्यात आले.
डोंगरगाव (ता. पाचोरा) येथील काही मजूर कामानिमित्त मनमाड गेलेले होते. क्रूझर गाडीने (क्रं. एमएच १३ एसी ५६०४) घरी डोंगरगावला परत येत असताना रात्री चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावरील हिरापूर गावाजवळ क्रूझर भरधाव वेगात असल्याने अचानक घसरली. गाडी वेगात असल्याने रस्त्यावर आदळून झालेल्या अपघातात गाडीतील ३ जण जागीच ठार झाले.
अपघात इतका भीषण होता, की गाडीतील सर्वच्या सर्व मजूर गंभीर जखमी झाले, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. कमलेश हरी काटे, बापू सुभाष पाटील, शेखर राजेंद्र तडवी, अनिस तडवी, शाहरुख तडवी, चंदन हरी काटे, मुक्तार तडवी, दिलीप तडवी, विकास तडवी, सचिन तडवी, नाना प्रभाकर कोळी व इतर प्रवासी वाहनात होते. अपघाताची माहिती समजताच आमदार मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी तातडीने दोन रुग्णवाहिका रवाना केल्या.स्वतः लगेचच ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींवर उपचार करण्यासंदर्भात डॉक्टरांना योग्य त्या सूचना केल्या.