मुंबई राजमुद्रा दर्पण । ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला आहे. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असून तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
कर्नाटकात सापडलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 11 तारखेला तर दुसरा 20 नोव्हेंबरला भारतात आला होता. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता ओमिक्रॉनचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यातलाच एक रुग्ण हा 64 वर्षाच आहे तर दुसरा रुग्ण हा 44 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्ण हे पुरुष आहेत आणि चाळीस वर्षाच्या पुढं आहेत. या दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महाराष्ट्रात आफ्रिकेतून आलेले 9 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉननं हाहाकार माजवलाय. तिथं दिवसाला कमीत कमी 4 हजार रुग्ण सापडतायत. सध्या तिथली रुग्णांची संख्या 10 हजाराच्या वर गेलेली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या बहुतांश प्रांतात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडतायत. त्यामुळेच महाराष्ट्रासह देशभरात आफ्रिकेतून आलेल्या आणि येणाऱ्यांवर प्रशासनाचा वॉच आहे. फक्त दक्षिण आफ्रिकाच नाही तर इतर आफ्रिकन देशातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढतायत. त्यात मोझंबिक, बोत्सवाना, झिम्बाब्वे अशा देशांचा समावेश आहे.