औरंगाबाद राजमुद्रा दर्पण । संजय राऊत यांचे नेतेच बदलल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच राऊत यांचे तीन नेते कोण यांची नावंही फडणवीसांनी सांगितली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांना जोरदार कोपरखळ्या लगावल्या आहेत. त्यांचे नेते अलिकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी झाले आहेत. मला वाटतं तिच प्रचिती त्यांच्या अग्रलेखातून दिसत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
एसटीच्या संपारवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. एसटीचा संप मिटावा म्हणून विरोधी पक्ष म्हणून आम्ही भरपूर सहाकार्य केलं. आता सरकारने दोन पावलं पुढे यायला हवं. पण सरकार कामगारांसाठी दोन पावलं पुढं यायला तयार नाही. काल उपोषणकर्त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं कळलं. मला वाटतं सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे. अजूनही वेळ गेली नाही. मेस्मा लागण्याआधी चर्चेतून मार्ग काढा, असं आवाहन फडणवीस यांनी केलं.
नायर रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणावरूनही त्यांनी सरकारला फटकारले. या घटना सातत्याने घडत आहेत. पण त्यावर सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. दुर्देवाने नायरमध्ये कोणी बघायलाही गेले नाही. आमच्या नगरसेवक आणि आमदारांनी मुद्दा मांडल्यावर त्यांना जाग आली. सत्तेच्या अहंकारात एवढे मदमस्त झालेले राज्यकर्ते कधीच पाहिले नाही, जनता यांना कधीच माफ करणार नाही, असं फडणवीस म्हणाले.