जळगाव राजमुद्रा दर्पण । जिल्हा परिषदांच्या गटांची संख्या वाढवण्यास मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. जळगाव जिल्हा परिषदेचे दहा गट अर्थात सदस्य संख्या दहाने वाढत आहे. गट वाढल्यामुळे पंचायत समिती सदस्य अर्थात गणांची संख्या वीसने वाढणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५५ व जास्तीत जास्त ८५ असे करण्याचे प्रस्तावित आहे. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता देखील देण्यात आली आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषदांची निवडणूक नवीन गट रचनेनुसार होणार हे मात्र निश्चित आहे.
जि. प.च्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या आणि निवडणुकीद्वारे भरवण्यात येणाऱ्या अशा जिल्हा परिषदेमधील जागांची संख्या यामधील प्रमाण शक्य असेल तिथपर्यंत राज्यभर सारखेच असेल. ५५ निर्वाचक गटांची किमान संख्या राज्यातील जिल्ह्यांमधील कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांसाठी नियत वाटप करण्यात येईल. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथे दोन, अमळनेर, चोपडा, रावेर, जामनेर, धरणगाव येथे प्रत्येकी एक गट वाढतील असा अंदाज असून बोदवड, मुक्ताईनगर येथे गट वाढणार नसल्याचे राजकीय वर्तुळातून समजते. तर जळगाव जिल्हा परिषदच्या आगामी निवडणुकीत १० गट व पंचायत समितीचे २० गण वाढणार असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेसाठी सध्या ६७ गट असून ते दहाने वाढून ७७ होतील. तर गणांची संख्या देखील १३४ वरून १५४ होतील असे सांगण्यात येत आहे.