नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । एटीएममधून ट्रान्झेक्शनच्या नियमांमध्ये बँक 1 जानेवारीपासून बदल करणार आहे. एटीएम फ्री ट्रान्झेक्शनच्या मर्यादेनंतर एटीएम ट्रान्झेक्शनवरील शुल्क वाढवण्यास रिझर्व्ह बँकेनेही मंजुरी दिली आहे. त्यानुसार एटीएमच्या फ्री लिमिटनंतर केल्या जाणाऱ्या ट्रान्झेक्शवर 1 जानेवारीपासून अधिक शुल्क भरावा लागणार आहे. नवीन नियमांनुसार ग्राहकांना फ्री एटीएम ट्रान्झेक्शन मर्यादेनंतरच्या ट्रान्झेक्शनवर 21 रुपये शुल्क आणि जीएसटी द्यावा लागणार आहे. सध्या हे शुल्क 20 रुपये इतके आहे. RBI ने 1 जानेवारी 2022 पासून बँकांना रोख आणि नॉन-कॅश एटीएम व्यवहारांवर मोफत मासिक मर्यादेपेक्षा जास्त शुल्क वाढवण्याची परवानगी दिली आहे.
बँकांनी एटीएम व्यवहार शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी, सामान्य ग्राहकांना या निर्णयाची फारशी काळजी करण्याची गरज नाही, कारण या निर्णयाचा परिणाम केवळ मोफत मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवरच होणार आहे. बँका त्यांच्या ग्राहकांना एका महिन्यात एटीएममधून आर्थिक आणि गैर-आर्थिक असे पाच मोफत व्यवहार देत राहतील. याशिवाय, महानगरांमध्ये राहणाऱ्या बँक ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएममधून महिन्यातून तीन मोफत आणि छोट्या शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार करण्याची सुविधाही सुरू राहणार आहे.