जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने 21 पैकी 20 जागा जिंकून मोठे यश मिळविले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका आम्ही तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत, असा विश्वास शिवसेना नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
या निवडणुकीबाबत बोलतांना जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेवर शिवसेना, राष्ट्रवादी र्कांग्रेस व कॉंग्रेस या तीन पक्षाने एकत्रित यश मिळवून महाविकास आघाडीचा झेंडा फडकविला आहे. पुढच्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुकांना अद्याप दोन वर्षे बाकी आहे. पण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपालिकेच्या निवडणुका येत्या दोन ते सहा महिन्यात लागणार आहेत. त्यात स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिले आहेत. जिथे जिथे महाविकास आघाडी होईल, तिथे तिथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीमुळे आमचे बळ वाढलेले आहे, त्यामुळे येत्या जिल्हा परिेषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार आहे, असं पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.