जळगाव राजमुद्रा दर्पण । विलीनीकरणाच्या मागणी बाबत गेल्या काही महिनाभरापासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्य शासन व प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. जळगाव विभागातून आतापर्यंत ३३२ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे, दुसरीकडे कारवाईच्या भीतीने चारशेहून अधिक कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
मंगळवारी ५१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, १५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात संपात सहभागी झालेल्या एकूण २८१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, आतापर्यंत ३३२ कर्मचारी निलंबित केले आहेत. जळगाव जिल्ह्यात एकूण कार्यरत चार हजार ४४२ कर्मचारी संपावर आहेत. निलंबनाच्या कारवाईच्या भीतीने काही कर्मचारी सेवेत रुजू झाले. जळगाव जिल्ह्यातील ४१७ कर्मचारी कामावर रुजू झाले होते. यात २८ चालक व २१ वाहकांचा समावेश आहे. या रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून भुसावळ, अमळनेर व जळगाव आगारातून बससेवा सुरू केली आहे. यामुळे चोपडा, जामनेर, पाचोरा व धुळे मार्गावर बस सुरू आहेत.