(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सध्या मोठ्या प्रमाणावर नागरिक बेहाल झाले असून पोलीस यंत्रणाही मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेण्यासाठी सक्षम असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या काळामध्ये सध्या व्यवसायिक आवक-जावक बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उदरनिर्वाहाची समस्याही निर्माण झालेली आहे. या परिस्थितीवर बर्याच सामाजिक संस्थांकडून मोलाची मदत होत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्हा युवा सेना व नेहरू चौक मित्र मंडळ जळगाव यांच्या एकत्रित मदतीतून सध्या शहरातील चौकाचौकात सतत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना पाणी बॉटल व ज्यूसचे वाटप करण्यात येत आहे.
लॉकडाऊनच्या काळामध्ये पोलीस प्रशासनावर सध्या मोठ्या प्रमाणावर जबाबदारीचा डोंगर कोसळला आहे. यातून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्यावर कडक निर्बंध लावण्याची जबाबदारीही पोलिसांवर आहे. सर्वांनी घरात राहावे यासाठी पोलीस मात्र रस्त्यावर उन्हातानात आपले कर्तव्य बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी ज्युस आणि पाणी बॉटल जळगाव जिल्हा युवा सेना व नेहरू चौक मित्र मंडळातर्फे देण्यात येत असून पोलिसांचा उत्साह वाढवण्यात येत आहे.
जळगाव जिल्हा युवा सेना आणि नेहरू चौक मित्र मंडळ या उपक्रमासोबतच सकाळी व संध्याकाळी रोज १०० गरजूंना मोफत जेवणही पुरवत आहेत. मेहरुण तलाव, शहरातील राम मंदिर तसेच मोहाडी रोड जवळील गरीब वस्तीमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात गरीब गरजू नागरिकांवर निर्माण झालेली ही परिस्थिती पाहता या योजनेचे नियोजन असल्याचे युवा सेनेकडून सांगण्यात आले. या उपक्रमात नेहरू चौक मित्र मंडळाची त्यांना मोलाची साथ मिळाली आहे.
सायंकाळी पाणीवाटप प्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख पियुष गांधी, उप महानगरप्रमुख जय मेहता, रिकेश गांधी, रोहित शिरसाठ, वैभव जगदाळे, दर्शन बारी, प्रसाद विसपुते, युवराज काठूरिया, किरण मेहता आदींचा ताफा या मदतीमध्ये मोठ्या प्रमाणावर हातभार लावत आहे. सामाजिक दायित्वातून गरजू नागरिकांची उपासमार होऊ नये त्याचप्रमाणे अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर जबाबदारीचा डोंगर त्रासदायक ठरू नये म्हणून ही संकल्पना राबवण्यात येत असल्याचे उपजिल्हाप्रमुख पियुष गांधी यांनी सांगितले.