मुंबई राजमुद्रा दर्पण । भाजपा नेते आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासंबंधीच्या वक्तव्यप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरळीतल्या सिलिंडर स्फोट प्रकरणी टीका करताना शेलारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
किशोरी पेडणेकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आज आशिष शेलार यांनी जामीनासाठी अर्ज केला. त्यानंतर शेलार यांना 1 लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर केला आहे. इतकंच नाही तर शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत महापौरांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.
‘जी केस बनूच शकत नाही ती केस बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आम्ही कायदा सुव्यवस्था मानणारे आहोत, न्यायिक व्यवस्थेला मानणारे आहोत. त्यामुळे खोटा का होईना गुन्हा त्यांनी काल दाखल केला त्याबद्दल मी जामीन घेतला. त्याबरोबरीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा एफआयआर क्वॅश केला पाहिजे, यासाठी मि क्वॅशिंग पिटिशनही दाखल केलं आहे. त्याची कॉपीही पोलिस ठाण्यात दिली आहे. न्यायिक व्यवस्थेतून सत्य मी बाहेर आणेन, पण यांना पुन्हा सांगू इच्छितो की, आम्ही सगळे सहकारी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाविरोधात संघर्ष अजून कडवा करु. तुम्ही जेवढा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल, भारतीय जनता पार्टी तो आवाज अजून उचलेल आणि तुमची कू कृत्य जनतेसमोर उघड करु’, असा इशारा शेलार यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला दिलाय.