मुंबई राजमुद्रा दर्पण । आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणात खात्याच्या काही अधिकाऱ्यांचाच हात असल्याचे उघड होत आहे. त्याची जबाबदारी आता आरोग्य मंत्र्यांवर आली असून आता माफी मागून किंवा दिलगिरी व्यक्त करून भरून चालणार नाही. विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश टोपे यांनी आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
आरोग्य खात्यातील 6 हजारांहून अधिक जागांची भरती रखडवून ठाकरे सरकारने उमेदवारांना नैराश्यात ढकलले होते. वारंवार मागणी करूनही परीक्षांबाबत चालढकल करण्यात येत होती. वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या एजन्सीला परीक्षांचे कंत्राट देण्यासाठी त्यांच्या सोयीकरिता तब्बल 21 वेळा निविदेत बदल करण्यात आला. तेव्हाच ठाकरे सरकारचा हेतू स्पष्ट झाला होता, असं उपाध्ये म्हणाले.
परीक्षांच्या काही तास अगोदर काही उमेदवारांना व्हॉटसअप, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका मिळाल्या, अखेरच्या क्षणी वेळापत्रक बदलून परिश्रमपूर्वक तयारी करणाऱ्या उमेदवारांची फसवणूक करण्यात आली, तरीही आरोग्यमंत्री राजेश टोपे मात्र, एजन्सीची पाठराखण करून परीक्षा वेळेवर व पारदर्शक होण्याच्या बढाया मारत होते. पेपरफुटी ही अफवा नसल्याचे सिद्ध होऊनही आरोग्यमंत्र्यांनी वारंवार त्यावर मौन धारण केले, आणि आता या परीक्षेतील गैरव्यवहारांचे बिंग फुटल्यावर मात्र ते मूग गिळून गप्प बसले आहेत. या गोंधळामुळे ज्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे, त्याची जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्र्यांनी पायउतार व्हावे व ठाकरे सरकारने दहा लाख विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.