नवी मुंंबई राजमुद्रा दर्पण । महाविकास आघाडीमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे, सोबतच आम्हाला भाजप काही फार लांब नाही, आम्ही कोणाबरोबर युती, आघाडी करायची याचे सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेना नेते काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र बोलायचे एक आणि करायचे एक हे खपवून घेतले जाणार नाही. भाजप आम्हाला फार लांब नाही. आम्ही आघाडी धर्म पाळून विरोधी पक्षात असलेल्या भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका करायची. तुम्ही मात्र पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्ही शत्रुत्व का घ्यायचं? राजकारणातील गणितं कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे याचे पर्याय खुले आहेत,” असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले आहेत. येत्या काळात राज्याती अनेक महत्त्वाच्या शहरातील महापालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्येही आघाडी कायम राहिल्यास शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून जुंपण्याची चिन्हे आहेत.