(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा)
क्रिकेट सट्टेबाज सोनू जालान याने गुन्हे अन्वेषण विभागाला दिलेल्या जबाबात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्याला ‘मोठ्या केस’ मध्ये अटक नको असेल, तर माजी पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा यांच्याकडे 10 कोटी रुपये जमा करायला सांगितले होते.” असा मोठा आरोप सोनू जालानने केला आहे. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी आता आणखी वाढवण्याची शक्यता निर्माण होत आहे.
“मोठ्या प्रकरणात अटक टाळायची असेल, तर माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याकडे १० कोटी रुपये जमा कर” असं परमबीर सिंग यांनी आपल्याला सांगितल्याचा आरोप सोनू जालानने केला आहे. सोनू जालानच्या आरोपावर परमबीर सिंग किंवा प्रदीप शर्मा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सीआयडी तर्फे परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांच्यावर करण्यात आलेल्या खंडणीच्या आरोपांची चौकशी केली जात आहे.
आपल्या आरोपांसंबंधी सोनू जालानने महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांना पत्र लिहिले होते. या पत्रानंतर सीआयडीने तपास सुरु केला. बेटींग प्रकरणात मे २०१८ मध्ये अटक झाल्यानंतर आपल्याला परमबीर सिंग यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी ते ठाणे पोलीस आयुक्त होते. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने सोनू जालानला अटक केली होती.
त्यावेळी परमबीर सिंग यांनी सोनू जालान आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठ्या केस मध्ये अडकवण्याची धमकी दिली होती. दोन महिन्यापूर्वी परमबीर सिंग यांच्या पत्राने राजकारणात खळबळ निर्माण केली होती. सचिन वाझे प्रकरणाचा परमबीर सिंग यांना फटका बसला. त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. कोर्टात याचिका दाखल केली. परिणामी अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता परमबीर सिंग यांची जुनी प्रकरणे समोर येत असून त्यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत. या आरोपांतून परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.