मुंबई राजमुद्रा दर्पण । ओमायक्रॉनचे मुंबईत ३ तर पिंपरी – चिंचवड शहरात ४ रुग्ण आढळून आले आहे. राज्यात आजवर एकूण १७ ओमायक्रॉन विषाणू बाधितांची संख्या झाली आहे. मुंबईत संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता पुढील दोन दिवस कलम 144 लागू करण्यात आले आहे. या काळात मोठमोठे मेळावे, रॅली आणि निषेध मोर्चांवर बंदी असेल.
मुंबईत आढळलेले ३ रुग्ण हे ४८, २५ आणि ३७ वर्षाचे पुरुष असून, त्यांनी अनुक्रमे टांझानिया, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका या देशांमधून प्रवास केलेला आहे. तर, पिंपरी – चिंचवडमध्ये आढळलेले ४ ही रुग्ण नायजेरियावरून आलेल्या व ओमायक्रॉन बाधित आढळेलेल्या महिलेचे नातेवाईक आहेत. आढळलेल्या ७ रुग्णांपैकी ४ जणांचे लसीकरण पूर्ण आहे. एका रुग्णाने लसीचा एक डोस घेतला आहे, तर एकाचे लसीकरण झालेले नाही. एका रुग्णाचे वय साडे तीन वर्ष असल्याने लसीकरण झालेले नाही. ४ रुग्ण लक्षणेविरहित आहेत तर, ३ रुग्ण सौम्य स्वरुपाचे आहेत.
बाहेर देशातून आलेल्या सर्व ९६७८ प्रवाशांची तर इतर देशातून आलेल्या १२४९ अशा एकूण १० हजार ९२७ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. त्यातील अतिजोखमीच्या देशातून आलेल्या व कोरोनाबाधित असलेल्या २० प्रवाशांची तर इतर देशातून आलेल्या पण कोरोना संसर्ग झालेल्या ५ अशा एकूण २५ रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.