देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची IMA ची मागणी
(राजमुद्रा वृत्तसेवा)
योगगुरु स्वामी रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांच्यातील वाद चिघळत असल्याचे दिसत आहे. अॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर झालेल्या टिकांचा IMA ने आक्षेप नोंदवत योगगुरु स्वामी रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे. योगगुरु रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा अशी मागणी पत्रात करण्यात आली असल्याने IMA ची ही उपचार पद्धती स्वामी रामदेव यांच्यावर चांगलीच महाग पडण्याची चिन्हे दिसून येत आहे.
“योगगुरु रामदेव यांच्याकडून लसीकरणाबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. एका व्हिडिओत त्यांनी १० हजार डॉक्टर आणि १ लाख लोकं कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन मृत पावल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा”, अशी मागणी IMA ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून केली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उत्तराखंड शाखेनेही योगगुरु स्वामी रामदेव यांना नोटीस पाठवली असून अब्रुनुकसानीसाठी १ हजार कोटींची भरपाई देण्यात यावी असे या नोटीसीमध्ये सांगण्यात आलं आहे. अॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर केलेल्या टीकेप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली असून येत्या १५ दिवसात माफी मागितली नाही, तर १ हजार कोटी रुपयांचा दावा केला जाण्याचे या पत्रात म्हटले आहे.
योगगुरु रामदेव यांनी एका व्हायरल व्हिडिओत कोरोनाच्या मृत्यूमागे अॅलोपॅथी कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितले होते. कोरोना रुग्णांवर अॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला होता. या वक्तव्यामुळे कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी विद्रोही भूमिका घेत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनीही त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत विधान मागे घेण्यास सांगितलं होतं. योगगुरु स्वामी रामदेव यांनी आपले विधान मागे घेतले असले तरी हा वाद चांगलाच चिघळला असल्याचे आता दिसून येत आहे. आता या चिघळलेल्या वादरुपी जखमेवर नेमकी कोणती (ऍलोपॅथी की आयुर्वेदिक) उपचारपद्धती लागू होईल हा प्रश्न उपस्थित होत आहे.