जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : मनुष्याला सांसारिक सुखात अडचणीच्या काळात मार्ग दाखविण्याचे काम गीता ग्रंथ करतो. सहजरित्या धार्मिक ग्रंथांचे पारायण केले तर भगवंतांची अनुभूती येते. मोह, मद, मत्सर, क्रोध, लोभ, काम अशा षड् रिपुंवर नियंत्रण ठेवायला गीता पठण महत्वाची असल्याचे मार्गदर्शन हभप धनराज महाराज पाटील अंजाळेकर, जळगाव यांनी केले.
नेहरू नगरातील शिवराज फाउंडेशन द्वारा आयोजित श्रीमद् संगीतमय भागवत कथा आणि हरिनाम कीर्तन सप्ताह दि. १२ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हरिकिर्तन सप्ताहच्या तिसऱ्या दिवशी हभप धनराज महाराज अंजाळेकर यांनी कीर्तनातून भाविकांना प्रबोधित केले. प्रसंगी शहराचे आ.राजुमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते भागवताचार्य सोपानदेव महाराज आणि हभप धनराज महाराज यांचा हृदय सन्मान करण्यात आला.
हभप धनराज महाराज यांनी संत तुकाराम यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग कथन करून भाविकांना त्यातील बोध उलगडून सांगितला. व्यक्तीच्या आयुष्यात निष्ठा महत्वाची असून त्यातून सेवाभावाचे महत्व दिसून येते. आयुष्यात श्री गुरु प्राप्त होण्यासाठी देवापेक्षा दुप्पट भक्ती लागते. गुरू परब्रह्मचे महत्व अनन्यसाधारण आहे. गिरवू सर्वश्रेष्ठ असून, ज्याला श्री गुरू मिळाले, त्याचे आयुष्य सार्थकी लागले असेही मार्गदर्शन हभप धनराज महाराज अंजाळेकर यांनी केले.
हरिकीर्तन सप्ताहात गुरुवारी दि. १६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता वावी, नाशिक येथील हभप पांडुरंग महाराज गिरी यांचे कीर्तन होईल. भाविकांनी नेहरू नगरातील गुरुदत्त मंदिर येथे उपस्थिती द्यावी, असे आवाहन शिवराजे फाउंडेशनतर्फे नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी केले आहे.