जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : येथील मेहरूण भागांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि वैद्यकीय उपक्रमांच्या हेतूने तरुणांनी ‘मेहरूण फाऊंडेशन’ ची स्थापना केली आहे. फाउंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी १२ डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे निमित्त साधून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सकाळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मेहरुण फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रतिमापूजन करीत वंदन केले. त्यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या हस्ते फीत कापून ‘मेहरूण फाउंडेशन’च्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी माजी महापौर सीमाताई भोळे, नगरसेवक गायत्री राणे, मेहरुण प्रभागाचे नगरसेवक प्रशांत नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी उपस्थित होते.
मेहरूण फाउंडेशनच्या वतीने प्रभागातील दारिद्ररेषेखालील नागरिकांना हिवाळ्यानिमित्त ब्लँकेट वाटप करण्यात आले. तसेच शासकीय रुग्णालयामध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे निमित्त साधून रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
‘मेहरूण फाउंडेशन’तर्फे नागरिकांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे, सामाजिक दृष्टिकोनातून आवश्यक ती मदत नागरिकांना मिळवून देणे, तरुणांमध्ये क्रीडा विकास होण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच प्रभागांमध्ये सांस्कृतिक वातावरण निर्माण करून वैचारिक समृद्धी निर्माण होण्यासाठी कार्यरत राहणे अशी कामे प्रामुख्याने केले जातील, अशी माहिती मेहरूण फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश नाईक यांनी दिली.
उद्घाटनावेळी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्यासह वैभव सानप, राहुल वंजारी, गौरव घुगे ,आकाश नाईक, योगेश लाडवंजारी,विवेक सानप, आकाश घुगे, आदी फाउंडेशनच्या कार्यकर्ते उपस्थित होते.