जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | संपूर्ण महाराष्ट्रातील मायक्रो फायनान्स महिला बचत गटांचे मार्च 2020 पर्यंतचे संपूर्ण कर्ज केंद्र सरकारने माफ करावे , या मागणीसाठी दि पीपल्स फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती गायत्री विश्वनाथ सोनवणे व त्यांच्या समस्त सहकारी महिला यांच्या नेतृत्वाखाली बचत गट कर्ज धारक महिला 12 ऑक्टोबर 2021 पासुन 13 डिसेंबर 2021 पर्यंत सुमारे 63 दिवसांपासुन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव समोर धरणे आंदोलनाला बसलेल्या होत्या . विविध पक्ष, संघटना व समाजसेवक यांनी सदर आंदोलनास भेट दिली व पाठिंबा जाहीर केला. दरम्यानच्या काळात खासदार उन्मेष पाटिल, खासदार रक्षाताई खडसे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही आंदोलकांशी चर्चा केली व आंदोलन स्थगित करण्यासाठी विनंती केली होती. परंतु याविषयी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून खासदार उन्मेष पाटील यांच्याकडून लेखी आश्वासन मिळत नसल्याने आंदोलकांनी आजपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले. मागील तीन – चार दिवसांपासून खासदार उन्मेष पाटिल यांनी आंदोलक महिलांशी फोनवर चर्चा करून , सदर मागणी अधिवेशनात मांडुन व केंद्र सरकारच्या माध्यमातुन किंवा संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याविषयी लेखी आश्वासन पत्र दिले . सदर पत्र आमदार सुरेश भोळे व जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी विलास हरणे यांच्या हस्ते आंदोलन स्थळी आंदोलांकर्त्या श्रीमती गायत्री विश्वनाथ सोनवणे व त्यांच्या समस्त महिला सहकारी यांना देण्यात आले. या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. यावेळी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, कांग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाअध्यक्ष अमजद पठाण, जननायक फाऊंडेशनचे फिरोज पिंजारी , शिवसेना महानगर जिल्हा उपाध्यक्ष फरीद खान, लोकशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष पराग कोचुरे , धर्मरथ फाऊंडेशनचे विनायक पाटिल , मुस्लिम सेवा संघाचे महिला जिल्हाध्यक्ष फिरोजा शेख, विनोद अढाळके, छाया जाधव, आयेशा मणियार, चारुलता सोनवणे, दिपीका भामरे , धारा ठाकर आदि उपस्थित होते. सदर मागणीला योग्य न्याय न मिळाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपात आंदोलन उभारण्यात येईल असे श्रीमती गायत्री विश्वनाथ सोनवणे व सहकारी महिला आंदोलांकर्त्या कळवले आहे.