जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महाविकास आघाडी मधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरं जा, अशा शब्दात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुलाबराव पाटलांना इशारा दिला आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. थेट महिला आयोगाने मंत्री गुलाबराव पाटलांच्या व्यक्तव्याची नोंद केल्याने गुलाबराव पाटलांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांच्या यांनी थेट त्यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.
गुलाबरावांनी आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे असल्याचं सांगतक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. तर खडसे यांनीही पाटील यांना उत्तर देताना काम केलं म्हणून जनतेनं आपल्याला निवडणूक दिलं, असा पलटवार केला. मात्र, गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवसेना उमेदवाराच्या प्रचारावेळी पाटलांचं वक्तव्य
मुक्ताईनगर मतदार संघातील बोदवड नगर पंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या ठिकाणी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकलेत. शिवसेना उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना पाटील यांनी बोदवडमधील रस्त्यावरुन खडसे यांच्यावर टीका केली.
गुलाबरावांच्या टीकेला खडसेंचं प्रत्युत्तर
गेली 30 वर्षे ते या भागातील आमदार आहेत. पण ते चांगले रस्ते करु शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनीच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत, असं वक्तव्य पाटील यांनी केलं. तर खडसे यांनीही गुलाबरावांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, गेली 30 वर्षे मी या भागातून निवडून येत आहे. मी कधीच हरलो नाही. काम केल्यामुळेच लोकांनी मला निवडून दिलं आहे. हे पाटलांनाही माहिती आहे, असं खडसे म्हणाले.
प्रवीण दरेकरांची कारवाईची मागणी
‘गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांचे गाल आणि रस्ते यांची तुलना केली आहे हे खरोखरत चुकीचे विधान आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाईचे आदेश देतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री नेहमीच त्यांच्या नेत्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आपापसात विसंवाद सुरु आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात नक्कीच भाजपला पसंती देईल’, असं ट्वीट करत प्रवीण दरेकर यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे