जळगाव राजमुद्रा दर्पण | राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या जळगाव दौऱ्याचे कवित्व थांबलेले नाही. या दौऱ्यात घडलेल्या अनेक रंजक..मनोरंजक..गंभीर.. पॉलिटिकल वॉर.. पलट वार आदी अनेक घटनांचे नेमके जिल्ह्यात काय परिणाम होतील हे आगामी काळात समोर येईलच. पण एक मात्र खरे जे काही परिणाम होतील ते अनेक नवीन समीकरणे जन्मास घालतील हे मात्र तितकेच खरे आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांची शहरात किती व कशी लोकप्रियता आहे याबाबत अनेकांचे वेगवेगळे मत असू शकते.पण,आमदार राजू मामा हे अत्यंत साधे”भोळे” आहेत याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही. अत्यंत शांत,संयमी असलेले आमदार भोळे यांना राग येतो हे सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही.पण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पोलीस मुख्यालयातील कार्यक्रमात आ.राजू मामा भोळे यांचा राग जाहीर झाला. उघडपणे त्यांनी तो व्यक्त देखील करत “आमची सुद्धा वेळ येईल तेव्हा पाहून घेईन..”असा इशारा वजा दम देखील भरला. त्यांचा राग पाहता ” अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यु आता है “असे अनेकांना वाटले असणार..
आ. राजू मामा भोळे यांच्या प्रयत्नातून जळगाव शहरात पोलीस मुख्यालय आवारात पोलिसांसाठी अत्यंत आकर्षक असे भव्य दिव्य निवासस्थानाच्या इमारतीचे काम मार्गी लागले आहे. दरम्यान, राज्यातील सत्ता बदलली तसे राजकीय वर्चस्व हेलकावे खाऊ लागले. राजू मामा सत्ता विरोधातले एक प्रमुख महत्वपूर्ण आमदार म्हणून मानले जात आहेत. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा दबदबा जिल्ह्याच्या राजकारणात आहे. आपण प्रयत्न केल्याने पोलिसांच्या निवासस्थानाची अत्यंत देखणी इमारत साकारास आली असताना त्याच्या उद्धाटन कार्यक्रमात पुरेसा मानसन्मान मिळावा अशी साहजिकच अपेक्षा असणाऱ्या आमदारांना आपल्याला जाणीपूर्वक डावलले जात असल्याची जाणीव झाली.त्याचा उद्रेक होऊन त्यांनी कार्यक्रमाच्या मंचावर जाण्यास नकार देऊन आपली नाराजी उघड केली.
प्रत्येक ठिकाणी वेळे आधी हजेरी लावणारे आ. राजुमामा भोळे मुळात कार्यक्रमाला थोड्या उशिराने पोहचले.आल्या आल्या आमदार महोदय मंचावर न जाता समोर नागरिकांसाठी ठेवलेल्या खुर्ची वर जावून बसले. हा प्रकार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,पालकमंत्री गुलाबराव पाटील, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांच्या देखत घडल्याने जिल्हा पोलिस प्रशासन पुरते गोंधळून गेल्याचे दिसत होते. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या करवी आ.भोळे यांनी मनधरणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण इगो दुखावलेले आ.राजू मामा यांनी आपला रुसवा कायम ठेऊन मी मंचावर येणार नाही असे स्पष्ट सुनावले. मंचावर या. नाही येणार.. या ना..नाही ..नाही अशा संगीत खुर्चीचा खेळ सुरू झाला.पण आ.राजू मामा यांचा रुसवा दूर करण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली.
अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीच आ. राजू मामा भोळे यांना मंचावर येण्याची विनंती केली.शेवटी पालकमंत्री विनंती करत असल्याने हो..नाही..करत आ. राजू मामा भोळे मंचावर विराजमान झाले. मात्र..”आमची वेळ येईल तेव्हा बघून घेईल..”असा दम देणारा इशारा त्यांनी दिलाच. हा इशारा नेमका कोणाला होता..राजू मामा कोणावर नाराज झाले.. त्यांना कार्यक्रमात पुरेसा मान सन्मान मिळायला नको अशी जाणीवपूर्वक व्यूहरचना तर करण्यात आली नाही ना.. असे एक ना अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत.
वास्तविक पोलीस निवासस्थानाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमाची रूपरेषा तयार करताना पोलीस विभागाने दक्षता घेणे गरजेचे होते. पण झाले उलटेच..”राजू मामा को गुस्सा भी आता है..” हे मात्र जळगावच्या जनतेला पहिल्यांदा समजून आले.