सातारा राजमुद्रा वृत्तसेवा | राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वादंग देखील निर्माण होत आहे. नेत्यांचे विविध वक्तव्य तसेच होत असलेला माफीनामा यावरून सत्ताधारी व विरोधक एकमेकांना कोंडीत पकडण्याचे काम करीत आहे. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाचा शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी तसेच राज्याचा संपूर्ण कारभार केंद्राकडे द्यावा असे विधान केले होते, यावरून असं विधान करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असा चिमटा शरद पवार यांनी चंद्रकांतदादांना काढला आहे.
साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेज येथील लोकनेते रामशेठ ठाकूर भवनचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, चेअरमन अनिल पाटील, रयत कौन्सिलचे रामशेठ ठाकूर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मीडियाशी संवाद साधताना पवारांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना मिश्किली रित्या चिमटे काढले आहे. राष्ट्रपती लागवट लागू करण्याबाबत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे शरद पवार म्हटले आहे.
राज्यातील विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थिर आहे. या सरकारला क्लिअरकट मेजॉरिटी आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी स्थिर सरकार देण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. म्हणूनच ते अशी विधानं करत आहेत. अशी विधाने याआधीही केली गेली होती. त्याचा काही परिणाम झाला नाही. अशा पद्धतीच्या विधानांना नागरिक गांभीर्याने घेत नाहीत, असा टोलाही पवारांनी लगावला. दरम्यान पवार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला असताना सरकार नेमका किती दिवस आणि कसे चालणार या संदर्भात देखील स्पष्टीकरण दिले असेल यामुळे भाजप करीत असलेल्या सत्ता बदलाच्या विषयाला तूर्तास तरी अवधी लागणार हे स्पष्ट आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांवर टीका केली होती. राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायचा असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट स्वीकारावी, असं आव्हान त्यांनी अशोक चव्हाणांना दिलं होतं. मार्च 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही आघाडी सरकारने ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा केला असता तर आतापर्यंत हा प्रश्न सुटला असता. पण आपण काहीही करायचे नाही आणि प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलायची असे आघाडी सरकारचे धोरण आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे व्यक्तव्य केले आहे.