(राजमुद्रा वृत्तसेवा)
तोक्ते चक्रीवादळाने नुकसान झाल्याने मदतीची याचना करणाऱ्या शिक्षिकेला, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपर्क साधला आहे. रणदिवे बाईंच्या विद्यार्थ्यांनी तातडीने दखल घेत, मदतीचं आश्वासन दिलं. तोत्के चक्रीवादळाने वसईतील वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झालं होतं. त्याबाबतचं वृत्त टीव्ही 9 ने दाखवलं. त्या वृत्ताची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली.
मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने सुमन रणदिवे या मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेला संपर्क साधून आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यात येईल अशी हमी देण्यात आली आहे. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडूनही रणदिवे बाईंशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्याकडूनही मदतीचं आश्वासन देण्यात आले आहे.
कोकणासह मुंबई उपनगरालाही तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिक्षिकेचंही या वादळात मोठं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील या तिन्ही बड्या नेत्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे या 90 वर्षांच्या आहेत. सुमन सध्या वृद्धाश्रमात आहेत. मात्र वसईतील या वृद्धाश्रमाला तोत्के वादळाचा फटका बसला. आता या वृद्धाश्रमाला मदत मिळावी, अशी मागणी या शिक्षिकेने आपले विद्यार्थी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
“या चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं. छप्पर उडालं. सगळ्या वृद्धांना रात्री झोपायला त्रास होतो. मच्छर चावतात. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असातना मी तुला शिकवले होते. इथली परिस्थिती खूप खराब आहे. कृपया आम्हाला मदत कर”, असं शिक्षिका सुमन म्हणाल्या.
सुमन लक्ष्मीकांत रणदिवे या दादर इथल्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत शिक्षिका होत्या. तिथे त्या गणित आणि विज्ञान हे विषय शिकवत होत्या. त्या 1991 मध्ये निवृत्त झाल्या आहेत.